Sunday, 29 March 2020

निरोप



निरोप....


झाडावर स्वच्छंद विहरणाऱ्या
चिमणीला बघून...
आज मानवाला
आलंं भरुन!
मुक्त ती ह्या जगात
अन् बंदिस्त मी माझ्याच घरात?
होताच नजरानजर,
चिमणी ही आली खिडकीवर.

“काय रे बाबा,
काय झालंय तरी काय?
दोन दिवस बघत्ये
कुणीच घराबाहेर पडत नाय!
ईवलासा जीव आमचा
जायचा घाबरुन,
कर्णकर्कश्य आवाजाने
उडायचो दचकून...
पण आता आमचाच चिवचिवाट
येतो ऐकायला,
खूप छान वाटतंय रे
स्वच्छ हवेत उडायला..._
पण जग जिंकायला निघालेला
तू हताश का रे झालास?
स्वत:च्याच घरात बंदिवान झालास?”

“काय आणि कसं सांगू तुला चिमणे,
अवघडच झालय गं आता जगणे!

विज्ञानाची धरुन कास,
जग जिंकण्याची होती आस

ईर्षा होती मनात
चढला होता माज,
पृथ्वी फक्त आपलीच,
आपणच करु राज...!

डोंगर फोडून, तळी बुजवून
निर्सगाचा केला ऱ्हास,
वाटलंच नव्हतं होऊ शकेल
कधी असाही त्रास!

मायेच्या स्पर्शाला लोटुन दूर,
रमलो आभासी जगात,
पैश्यामागे धावताना
जगत होतो भ्रमात...

आमच्या चुकीची शिक्षा
आता आम्ही भोगतोय,
न दिसणारा एक सुक्ष्म विषाणू
मानवालाच संपवतोय!

सारं जग झालंय हतबल
त्याच्या अस्तित्वाने
बंदिस्त केलंय आम्ही स्वत:ला
घरात नाईलाजाने.

केवळ स्पर्शाने निघालाय तो
मानवाला संपवायला,
घाबरलोय आम्ही आता
कुणालाही स्पर्श करायला

दुरूनच करतो आता
सगळ्यांची काळजी,
असो नातवंड की
आजोबा आणि आजी

अंगठ्याच्या स्पर्शाने जग
आलं होतं आमच्या मुठीत
पण आसुसलंय मन आता
घेण्या जिवलगांना मिठीत...!

चिमण्या पाखरा जा रे...
निरोप दे माझ्या  जिवलगांना,
काळजी घ्या रे स्वत:ची
महत्त्व द्या केवळ सुरक्षित जगण्याला...
केवळ सुरक्षित जगण्याला !!
                                                                               🖋स्वानंद आकसाळ,
                                                                               श्रीरामपुर,अहमदनगर(महा.)
                                                                                  मो. ७७०९९९७७८३


4 comments:

बाळकृष्ण...

#बाळकृष्ण  लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि "कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्य...